नमिता जैन, क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट नव्या वर्षात फिटनेसच्या दृष्टीनं काही संकल्प करत असाल, तर त्याची सुरुवात आतापासून करणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात अत्याधुनिक जीम आणि उत्तम आणि अनुभवी व्यायाम प्रशिक्षक या सर्वांमुळे कठीण वाटणारा व्यायाम आता सोपा वाटू लागलाय. तसंच, काळाची गरज जाणून अनेकांची पावलं जिमच्या दिशेनं वळू लागली आहेत.

तुमच्या संकल्पाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरतील अशा व्यायामाच्या

प्रकारांविषयी माहिती…

स्पीनिंग या व्यायामप्रकारात सायकल चालवण्यास प्राधान्य दिलं जातं. हे हृदय आणि फुफ्फुसासाठी फायदेशीर असतं. पायांच्या स्नायूंनाही बळकटी मिळते. सायकलींमध्ये येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे लोकांची सायकल चालवण्यात रुची वाढली आहे. सोबतच व्यायाम करण्यासाठी इतर पर्यायांसोबतच सायकलचा वापरही वाढतोय.

फायदे : शरीरातील अतिरिक्त चरबीचं प्रमाण घटतं, तग धरण्याची क्षमता वाढते.

एरोबिक्स नृत्यातून व्यायाम व्हावा यासाठी एरोबिक्सची निर्मिती करण्यात आली. एरोबिक्समध्ये केल्या जाणाऱ्या विविध शारीरिक हालचालींमुळे व्यायाम करणाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि नृत्यामधून होणाऱ्या व्यायामामुळे मानसिक आनंदही प्राप्त होतो. एरोबिक्समधील झुम्बा, भांगडा आणि शिमी हे नृत्यप्रकार खांद्यासाठी फायदेशीर असतात.

फायदे : तग धरण्याची क्षमता वाढते, चरबीचं प्रमाण घटवण्यास मदत.

बॉक्सरसाइझ किंवा बूट कॅम्प लष्करातील प्रशिक्षणासारख्या असणाऱ्या या व्यायामप्रकारात सीट-अप्स, धावणं, कमरेचे व्यायाम यांचा समावेश होतो. यासोबतच ‘टीआरएक्स सस्पेन्शन्स’ यांसारख्या शरीरावर ताण निर्माण करणाऱ्या व्यायामप्रकारांचाही समावेश असतो. बॉक्सरसाइझ या व्यायामप्रकारात शारीरिक हालचालींसोबतच अप्रत्यक्षपणे बॉक्सिंगचाही आनंद लुटता येईल. साधा व्यायामप्रकार आणि बॉक्सिंग याला एकत्रित करून ‘पिलॉक्सिंग’सारखा नवीन व्यायाम ट्रेंडमध्ये आहे.

फायदे : चरबीचं प्रमाण घटतं, स्नायूंना बळकटी मिळते, शरीर सुदृढ राहतं.

योग/पिलेट्स योगासनं शरीराची लवचिकता, ताकद वाढवण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यास मदत करतो. सध्या हॉट योगा, योगालेट्स, योग एरोबिक्स, कँडलेलिट योग यांसारख्या नवनवीन योगप्रकारांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पिलेट्ससारखे योगप्रकार हे पाठ आणि पोटाच्या स्नायूंसाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. नव्या ट्रेंडनुसार कार्यात्मक प्रशिक्षण आणि पिलेट्स एकत्रित करण्यात आले आहेत. ज्यामुळे शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असलेला समन्वय साधण्यास मदत होते. या व्यायामप्रकारात बोसू बॉल, वोबल बोर्ड्स आणि जिम बॉल्स यांची मदत घेतली जाते.

फायदे : कमरेसाठी उपयुक्त, रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडते.

अॅक्वा एरोबिक्स अॅक्वा एरोबिक्स या व्यायामप्रकारातही नवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात, ज्यात फ्लोट्स आणि पॅडल सोबतच नवीन व्यायामसाधनांची मदत घेतली जाते. नवीन ट्रेंड प्रकारात अॅक्वा एरोबिक्स, अॅक्वा पिलेट्स, अॅक्वा स्ट्रेच, अॅक्वा स्ट्रेंथ, अॅक्वा अॅरोबिक्स यांसारख्या पाण्यात केल्या जाणाऱ्या व्यायामप्रकारांचा समावेश होतो.

फायदे : चरबी घटते, स्नायूंची ताकद वाढते, शरीराची लवचीकता वाढते, तग धरण्याची

क्षमता वाढते.

व्यायामासाठी काही टिप्स तणावमुक्त राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसंच शरीर सुदृढ आणि सशक्त बनवण्यासाठी शरीरासाठी योग्य असे व्यायामप्रकार निवडायला हवेत, जे सातत्यानं तुम्हाला ऊर्जा देतील. व्यायामाच्या तासाचं वेळापत्रक आखा आणि प्रगतीचं निरीक्षण करा. चांगल्या गोष्टी सातत्यानं करा; पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. तुमच्या आहारात ऊर्जा वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. योग आणि पिलेट्स यांसारखे योगप्रकार तुम्हाला दररोजच्या ताणतणावातून मुक्त करण्यासाठी नक्कीच मदत करतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *