नियमित करा योगासन, ध्यान

वैद्यकीयशास्त्र हे मानवाला लाभलेले वरदान आहे. हे ज्ञान म्हणजे अमृत आणि हे देऊन मानवाचे दुःख निवारण करणारा डॉक्टर म्हणजे देवापेक्षा कमी नाही; अशी असंख्य रोगमुक्त लोकांची भावना असते. अशात जेनेटिक इंजिनीअरिंग, मॉलिक्युलर बायॉलॉजी, जैव रसायनशास्त्र, इमेजिंग तंत्र आता इतके प्रगत झाले आहे, की त्यामुळे शरीरातील सुक्ष्मातिसुक्ष्म गोष्टींचे ज्ञान होऊ शकते. सायबोर्गसारख्या शास्त्रामुळे तर बायोचिपद्वारे मानवी मनातील भावना, विचार यंत्रमानवाशी सुसंवाद साधू शकतात. परंतु असे असताना आपल्या आयोग्याची व हृदयाची काळजी घेण्याठी नियमितपणे योग, ध्यानधारणा करणे गरजेचे असते. सोबत योग्य हृदयतज्ज्ञाकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. परंतु नियमित व्यायाम केल्याने हृदयरोग दूर राहू शकतो. 

आता सर्वसामान्य लोकांतही योगाविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. विविध प्रकारच्या शारीरिक अस्वस्थता योगासनांमुळे दूर होता. योगशास्त्रात केवळ शरीराचाच नव्हे तर मनाचा, चित्तवृत्तींचा अभ्यास केला आहे. शरीराचे सुयोग्य संगम, समतोल राखण्याचे काम योग करते. शरीरातील हालचाली, श्वासोच्छ्वास नियंत्रित होतो. योगासोबत प्राणायामही करणे गरजेचे असते. असे करताना मनातील विचार सकारात्मक ठेवा. नकारात्मक विचारांचा मन आणि शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याने आजार बळावतात. त्यामुळे नेहमी सकारात्मकच विचार करावा. त्यामुळे ताणतणावही कमी होतो. धूम्रपान, मद्यपान, गुटखा सेवन, तंबाखू सेवन सोडायचे असेल, तरीही योग, प्राणायामाचा आधार घेता येईल. ध्यानधारणेतून सकारात्मक लहरी, स्पंदने शरीरावर परिणाम करतात. 

हृदयरोग गंडे, दोरे, अंगारे, धुपारे यांच्या माध्यमातून बरा होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे. अंधश्रद्धेच्या मागे लागण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फारच थोडे अंतर असते. त्यामुळे हे अंतर ओळखून सुयोग्य वैद्यकीय उपचार करून घ्यावेत. बरेचदा काही लोक वैद्यकीय ज्ञान नसताना, कोणतीही पदवी नसतानाही औषधोपचाराचा दावा करतात. यासाठी ते जडीबुटी आदींचा आधार घेतात. असे उपचारही कितपत करून घ्यायचे याचा विवेक प्रत्येकाने ठेवावा. रस्त्याच्या कडेला एका झोपडीत बसून जडीबुटीने यशस्वी औषधोपचार केल्याचा दावा करणाऱ्यांमुळे खरच फरक पडला असता, तर वैद्यकीयशास्त्राची गरजच भासली नसती. त्यामुळे हृदयरोगच नव्हे तर प्रत्येक रोगाच्या बाबतीत नागरिकांनी फसगत होऊ न देता, योग्य उपचार घ्यावेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *